अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवडणुकांपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा. अन्यथा दिवाळीच्या दिवशी हजारो शेतकरी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा घरासमोर चटनी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणुमुळे पिकलेला शेतमालही कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर न मिळाल्याने तोट्यात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. फडणवीस सरकारने अटी व शर्ती लादून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकर्यांना झालेला नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून शेतकरी राष्ट्रीयकृत, व्यापारी, सहकारी, पतसंस्था, आदी बँकेचे कर्ज थकले आहे. त्यामुळे त्यांना नवीन पिक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
हेही वाचा -कोकण विभाग अतिवृष्टी, पीकविमा व पर्यटन विकासासंदर्भात आढावा बैठक