अहमदनगर(शेवगाव) - चपडगाव कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. त्यानंतर चपडगाव येथे कापूस खरेदी केंद्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भेट दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट आणि शहराध्यक्ष भाऊ बैरागी व संतोष गायकवाड यांनी कापूस खरेदी केंद्राची पाहणी केली.
कापूस खरेदी केंद्रावर एका गाडी मागे हमाली जास्त घेण्याचे, काट्यामध्ये गडबड आणि कापसामध्ये तूट असे प्रकार सुरू होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेडरेशनच्या अधिकाऱयांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची लूट थांबवण्याचे आवाहन केले. यापुढे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची विनाकारण वसुली केली जाणार नाही, असे फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले.