अहमदनगर- पशू, पक्ष्यांवर प्रेम करावे असे आपण नेहमीच बोलत असतो. पण, प्रत्यक्ष कृती करताना फारच थोडे लोक दिसतात. अशाच मोजक्या लोकांपैकी एक आहेत, अकोले तालुक्यातील वीरगावचे शेतकरी रामदास अस्वले. त्यांनी आपल्या शेतातील १५ गुंठे जमिनीवर लावलेली ज्वारी पाखरांसाठी राखून ठेवली आहे. तसेच, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पक्ष्यांची जगण्यासाठीची धडपड पाहून मला हे करावे वाटले, असे ते म्हणतात.
सर्वत्र दुष्काळ पडल्यामुळे पक्षांना पाण्याचे आणि खाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पक्षी थोड्याशा अन्नासाठी रानोमाळ भटकत आहेत. त्यामुळे रामदास अस्वले यांनी त्यांच्या शेतातील ज्वारीचे पीक कापण्याऐवजी ते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या शेतात शिवारातील असंख्य जातीची पाखरं दाणे खाण्यासाठी येतात. तसेच, मधमाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मधमाशा देखील त्यांच्या शेतात मुक्कामाला असतात.