अहमदनगर - 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमांवर राज्य सरकारने अनेक निर्बंध आणले आहेत. याचा मोठा फटका शिवमूर्ती कारागिरांना बसला आहे. तसेच दरवर्षी शिवमूर्तीच्या खरेदीसाठी शिवप्रेमींचा मोठा ओढा असतो, तो कमी झाला आहे. शासनाच्या निर्बंधांमुळे शिवप्रेमींनी सरकारच्या निर्णयाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवमूर्ती कारागिरांना फटका तर शिवप्रेमीही नाराज.. मूर्ती कारागिरांना कोरोनाचा फटकाअहमदनगर शहरात राजस्थानी कारागिरांनी शिव जयंतीच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांच्या कडेला आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध आकाराच्या आणि छबीतल्या आकर्षक मुर्त्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र दरवर्षी होणारी शिव मूर्तींची विक्री निम्यापेक्षा घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रंग यांचे दर वाढलेले असताना तयार केलेल्या मूर्त्यांचा खप कमी झाला आहे. याबाबत राजस्थानी कारागीर कालूराम यांनी सांगितले की कोरोनामुळे तसेच शासनाने एकत्र येत शिवजयंती साजरी करताना घातलेले नियम आणि निर्बंध याचा मोठा फटका आम्हाला बसला आहे. मूर्त्यांचे दर साधारण तीनशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवमूर्ती विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे कालूराम यांनी सांगितले. कुटुंबातील सर्वजण वर्षभर विविध महापुरुष, देवी-देवतांच्या मूर्ती बनवत असतात, मात्र गेल्या वर्षी कोरोनाचे आगमन आणि त्यानंतर लागलेला लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसला आहे. आता शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर देखील तीच परिस्थिती आहे.
सरकारच्या निर्णयावर शिवप्रेमी नाराजएकीकडे शासनाने शिवजयंती साजरी करताना कडक नियम आणि निर्बंध घातले आहेत. तरीही अनेक शिवप्रेमी हे शिवजयंती साजरी करतीलच असे दिसून येत आहे. याबाबत शिवप्रेमींनी सरकारच्या शिव जयंतीबाबत घेतलेल्या निर्णयावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी निवडणुकांचा धडाका लावला आहे. राजकीय सभा, मिरवणूका, मेळावे, राजकीय यात्रा काढल्या जातात. त्या ठिकाणी हजारो लोक नियम पायदळी तुडवून एकत्र येत आहेत, सरकार या सर्वांना परवानगी देते, मात्र देशाचे दैवत आणि अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू देण्यावर कडक नियम आणि निर्बंध घालत असल्याबद्दल शिवप्रेमींनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. काहीही झाले तरी कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करणारच, असा निर्धार केल्याचे शिवप्रेमींना सांगितले.