साईबाबांच्या चरणी 30 लाखांचा नवरत्न हार शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांच्या खजिन्यात वाढ होत असल्याचे समोर आले आहे.साईबाबांवर माझी अतुट श्रद्धा आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला भरभराट आली. त्यामुळे ३१० ग्रॅम वजनाचा ३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हार साईचरणी अर्पण केल्याचे एका भक्तांना सांगितले. हैदराबादचे साईभक्त राजलक्ष्मी भुपाल आणि कामेपल्ली भुपाल या दाम्पत्याने साईना एवढी मोठी देणगी दिली. ३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हाराशिवाय ११७८ ग्रॅम वजनाचे ३१ हजार ७५२ रुपयांचे नैवेद्यासाठी चांदीचे ताट, ग्लास, प्लेट देखील अर्पण करण्यात आले आहे. यावेळी साईसंस्थानच्यावतीने भुपाल परिवाराचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईसंस्थानचे लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
साईंच्या दर्शनासाठी सहकुटुंब हजेरी :व्यवसायात चांगले यश मिळावे तसेच कुटुंब सुखी समाधानी रहावे, यासाठी बाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. आज मी माझ्या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहे. त्यामुळे आज बाबांच्या दर्शनासाठी माझ्या पती, मुलगा व माझ्या परिवाराला घेऊन आले. माझा मुलगाही बाबांचा मोठा भक्त असल्याचे यावेळी राजलक्ष्मी भुपाल यांनी सांगितले.
सुवर्ण कमळ साईबाबांना अर्पण : काही विवसांपूर्वी हैद्राबाद येथीलच साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 233 ग्रॅम वजनाचे 12 लाख 17 हजार 425 रुपये किंमतीचे सुवर्ण कमळ साईबाबांना अर्पण केले होते. हे कमळाचे फुल साईंना धूपारतीच्या वेळी चढवण्यात आले होते. अत्यंत सुबक कारागिरी आणि आकर्षक रेखीव काम केलेले हे फुल आहे. हे फुल हैद्राबादमध्येच तयार करण्यात आलेले आहे. भाविकाकडून साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात आलेले कमळ साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी स्विकारले. भाविक नेहमी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यावर साईबाबांचा आशिर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. नववर्षाच्या प्रारंभदिनी एका भाविकाने साईबाबांना तब्बल 47 लाखांचा मुकूट अर्पण केला होता.
गोल्डब्रासचे सिंहासन दान :कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील साईबाबा मंदीराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त हैद्राबाद येथील साईभक्त किर्ती गोपीकृष्णन व एस गोपीकृष्णन यांनी साईबाबा मुर्तीसाठी 7 लाख रुपये किंमतीचे गोल्डब्रासचे सिंहासन दान केले होते. या अगोदर त्यांनी मंदीरासाठी 5 लाख रूपये किंमतीची साईबाबांची मुर्ती दान केले होते. तर दुसरे साईभक्त कल्पना आनंदजी यांनी मुर्तीसाठी चांदीचा टोप दान केला होता.
हेही वाचा :Vip Darshan Shirdi: साईदर्शनाकरिता व्हीआयपीच्या नावाखाली होणारी बोगसगिरी थांबणार, संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय