महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : निंबळक पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात; स्नेहालयचा पुढाकार

दुष्काळ मुक्ती यज्ञ असे नाव दिलेल्या या संकल्पाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरेबाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

By

Published : May 8, 2019, 9:05 PM IST

अहमदनगर : निंबळक पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात; स्नेहालयचा पुढाकार

अहमदनगर - शहराजवळच असलेल्या निंबळक-इसळक या गावांना पाण्यासाठी वरदान असलेले दोन पाझर तलाव १९७२ च्या दुष्काळानंतर यंदा प्रथमच कोरडे पडले आहेत. मात्र प्राप्त परिस्थिती सकारात्मक घेत या दोनही तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचा संकल्प स्नेहालय या प्रसिद्ध सामाजिक संस्थेने उचलला आहे. अर्थातच स्नेहालयच्या या संकल्पात निंबळक-इसळक ग्रामस्थ आणि अनेक सामाजिक संस्था सहभागी होत आहेत.

अहमदनगर : निंबळक पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात; स्नेहालयचा पुढाकार

दुष्काळ मुक्ती यज्ञ असे नाव दिलेल्या या संकल्पाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरेबाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी भारतीय जैन संघटना,आनंदवन प्रगती सहयोग, उद्योजकांची आमी संघटना, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे कार्यकर्ते , विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक जल मित्रांच्या उपस्थितीत या अभियानाचा श्रीगणेशा झाला.

धबधबी आणि भुडकी हे दोनही पाझर तलावात नेहमी पाणी असते. मात्र या दरम्यान तलावात हजारो टन गाळ साचला गेल्याने तलावांची पाणी साठवण क्षमता कमी होत गेली आहे. गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने तलावांनी तळ गाठला आणि साठलेल्या गाळाची भयाण परस्थिती समोर आली. या परिस्थितीत पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर गाळ काढण्याचा संकल्प स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी निंबळक-इसळक ग्रामस्थांपुढे मांडला. त्याला ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संमती दिली. या उपक्रमात इतर अनेक सामाजिक आणि उद्योजक संस्थानी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच बुधवारपासून या दुष्काळ मुक्ती यज्ञास प्रारंभ झाला आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बदलणार नाही. त्यासाठी पाणी आणि जमीन या घटकांकडे डोळसपणे पाहण्याचे आवाहन यावेळी अण्णा हजारे यांनी केले. आज तलावात साठत असलेला गाळ पुढे धरणात जाणार आहे. वाढत्या गाळामुळे साठवण क्षमता कमी होऊन शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार असल्याने गाळ काढण्याचा उपक्रम गरजेचा असल्याचे अण्णांनी यावेळी सांगितले.

वाढते औद्योगिकरण, प्रदूषण, बांधकाम, जंगलतोड यामुळे आजची भयाण परिस्थिती निर्माण झाल्याचे पोपटराव पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकार पाणी समस्यावर काम करत असले तरी कुठेतरी व्यवस्था कमी पडत असताना अमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी प्रसिद्ध चेहरे करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे पवार यांनी सांगितले. यात सर्वांनी सहभाग नोंदवणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details