अहमदनगर- आर्थिक डबघाईचे कारण देत अनेक सहकारी साखर कारखाने खासगी लोकांना विकले. त्यावेळी झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते आज राळेगणसिद्धी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सहकारी साखर कारखाना घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, अण्णा हजारेंची मागणी
आर्थिक डबघाईचे कारण देत अनेक सहकारी साखर कारखाने खासगी लोकांना विकले. त्यावेळी झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
पुढे बोलताना अण्णा म्हणाले, की आम्ही उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे. याचिकेसोबत वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा व समित्यांचे चौकशी अहवाल पुरावा म्हणून जोडले आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पुराव्यांनुसार दोषी असणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाहीत. तसेच दिलेले पुरावे न पाहताच गुन्हा घडल्याचे दिसून येत नाही, असा अहवाल गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) पोलीस उपमहासंचालकांनी देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य पोलीस किंवा सीआयडी हे राजकीय दबावाखाली काम करते. त्यामुळे त्यांच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही, असेही अण्णा यावेळी म्हणाले.
सरकार आणि राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही. मात्र, उच्च न्यायालयाकडून शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल याची खात्री आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या संपूर्ण घोटाळ्याची न्यायालयीन निगराणीखाली सीबीआय मार्फत किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी असल्याचे यावेळी अण्णांनी सांगितले.