अहमदनगर - प्रवाशांच्या सेवेसाठी अशी ओळख असलेली लालपरी लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा जोमात धावू लागली आहे. एकट्या नगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात एसटीने जवळपास अडीच कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. पण आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात एसटी सुरू करण्यात आली आहे. राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अकरा आगारातून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक आता सुरू झाली आहे.
अनलॉकच्या सुरुवातीच्या टप्यात जिल्हाअंतर्गत एका सीटवर एक प्रवासी या पद्धतीने एसटी प्रवासाला परवानगी मिळाली. याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र 20 ऑगस्टपासून अनलॉकच्या पुढील टप्यात आंतर जिल्हा पूर्ण क्षमतेने प्रवासाला परवानगी मिळाल्यानंतर एसटीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एकट्या नगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचे उत्पन्न दोन कोटी 41 लाख इतके जमा झाले आहे.