लंडन - गतविजेती रोमानियाची टेनिसपटू सिमोना हालेपने विम्बल्डनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे तिने हा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे विम्बल्डनप्रेमींना धक्का बसला आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिमोना हालेपने सांगितलं की, मला हे सांगता दु:ख होत आहे की, मी यंदाच्या विम्बल्डनमध्ये भाग घेऊ शकणार नाही. कारण मी अद्याप दुखापतीतून पूर्ण सावरलेली नाही.
सिमोनाने २०१९ विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. तर विम्बल्डनचा मागील हंगाम कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.
सिमोनाने सांगितलं की, हा काळ खूप आव्हानात्मक आहे. मी प्रामाणिकपणे सांगते की, माघार घेण्याचा निर्णय घेताना मला खूप दु:ख झालं. हा काळ कठीण आहे आणि दोन मोठ्या स्पर्धांना मुकणं हे मानसिक आणि शारिरिक रुपाने खूप आव्हानाचे आहे.
दरम्यान, सिमोनाला मे महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेत दुखापत झाली. तिला या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान, दुखापतग्रस्त झाली होती. यामुळे तिला फ्रेंच ओपनमधून देखील माघार घ्यावी लागली. आता ती विम्बल्डनमधून बाहेर पडली आहे.
राफेल नदालची विम्बल्डनमधून माघार...
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शारिरिक थकवा जाणवत असल्याने त्याने या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे सांगितलं आहे. या संदर्भात नदालने ट्विट केलं. मी या वर्षीच्या विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपा नव्हता. पण शारिरिक थकवा पाहता आणि पुढील करियर पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होता, असे नदालने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा -मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार
हेही वाचा -Tokyo Olympics : नदालनंतर आणखी २ दिग्गज टेनिसपटूंची ऑलिम्पिकमधून माघार, दिलं 'हे' कारण