सिडनी -ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गिओसने कोरोनाव्हायरसमुळे यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. "कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेकडो आणि हजारो अमेरिकन लोकांच्या सन्मानार्थ ग्रँड स्लॅमपासून माघार घेत आहे", असे त्याने सांगितले.
31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत यूएस ओपन स्पर्धा होणार आहे. किर्गिओसपूर्वी, ऑस्ट्रेलियाची आघाडीची महिला टेनिसपटू एश्ले बार्टी हिनेसुद्धा या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
किर्गिओसने रविवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले, ''मी यावर्षी यूएस ओपनमध्ये खेळणार नाही. या निर्णयाचे मला दु:ख असेल. परंतु मी लोकांकरिता, माझ्या ऑस्ट्रेलियन संघासाठी, शेकडो आणि हजारो अमेरिकन लोकांसाठी, ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. आपण स्पर्धा आणि अर्थव्यवस्था पुन्हा तयार करू शकतो परंतु जीव गमावलेल्यांना परत कधीही आणू शकत नाही.''
कोरोनाकाळात अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आयोजित केलेल्या अॅड्रिन टेनिस टूर स्पर्धेवर किर्गिओसने टीका केली होती. या स्पर्धेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देण्यात आले होते. तर, नोव्हाक जोकोविचसह आघाडीच्या टेनिसपटूंना कोरोनाची लागण झाली होती.