टोकियो - भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस, टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या महिला 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 च्या अंतिम फेरीत सातव्या स्थानी राहिली. रुबिनाने शूटिंग रेंज फायनलमध्ये 128.1 गुणांची कमाई केली. इराणच्या सारेह जवानमार्दी हिने 239.2 गुणांसह विश्वविक्रम नोंदवत सुवर्ण पदक जिंकले.
रुबिना फ्रान्सिसची अंतिम फेरीच्या पहिल्या सिरीजमध्ये निराशजनक कामगिरी राहिली. या सिरीजमध्ये तिला 6.6 गुण घेता आले. यामुळे तिला सामन्यात वापसी करणे कठिण गेले. पहिल्या सत्रानंतर ती 93.1 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.
भारतीय नेमबाज रुबिनाने वापसी करण्याचा प्रयत्न केला. पण ती यात यशस्वी ठरली नाही. आठ खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडणारी ती पहिली खेळाडू ठरली.
रूबिना फ्रान्सिस पात्रता फेरीत 560 गुणांसह सातवे स्थान पटकावत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. दरम्यान, मध्य प्रदेशची रहिवाशी असलेल्या रुबिनाने जून महिन्यात पेरूमध्ये झालेल्या विश्व कप स्पर्धेत विश्वविक्रम केला होता. पण अशीच कामगिरी तिला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नोंदवला आली नाही.