टोकियो - भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला. मेरीने राउंड ऑफ 32 मध्ये डेमिनिकन गणराज्यच्या मिग्वेलिना गार्सिया हर्नाडेज हिचा 4-1 असा सहज पराभव केला.
सहावेळची विश्वविजेती मेरी कोमकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. मेरी कोमने देखील याची सुरूवात धडाक्यात करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तिचा पुढील सामना 29 जुलै रोजी कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंरिसाय व्हिक्टोरिया हिच्याशी होणार आहे.
मेरी कोम विषयी...
मेरी कोम इम्फाळ मणीपूरची आहे. तिने आतापर्यंत सहा वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेत मेरीने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.