मुंबई- जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्व जग एकजुटीने लढा देत आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज खेळाडू सोशल मीडियावरून लोकांना कोरोनाबद्दल जनजागृती करत आहेत. कोरोनावर मात करता येते, त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर आणि राज्यसभेची खासदार मेरी कोमचा एक व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी शेअर केला आहे. यात ती कोरोना विषाणूबाबत जनजागृती करताना दिसत आहे.
दिल्ली पोलिसांनी मेरी कोमचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे. यात मेरी कोम, लॉकडाऊन निर्देशाचे पालन करा, सोशल डिस्टेंसिंग ठेवा, वारंवार साबणाने हात धुत राहा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, असे आवाहन करताना पाहायला मिळत आहे. यासोबत तिने लॉकडाऊनच्या काळात, दिल्ली पोलिसांना मदत करण्याचेही आवाहन केले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मेरीने कोमनेही पुढाकार दर्शवला. राज्यसभा खासदार असेलल्या मेरीने आपल्या खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर केली आहे. यासोबत ती आपले एका महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहे. या मदतीची माहिती मेरीने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली.