नवी दिल्ली -कोरोना व्हायरसच्या तपासणीत भारतीय बॉक्सिंग संघांशी संबंधित डॉक्टर पॉझिटिव्ह आढळला आहे. तर, पटियालामध्ये सराव करणाऱ्या बॉक्सिंगपटूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, या तपासणीनंतर प्रस्तावित शिबिर पुढे ढकलले जाऊ शकते.
एशियन गेम्स चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिमध्ये रौप्यपदक विजेता अमित पांघलसह 11 बॉक्सिंगपटूना विश्रांती देण्यात आली आहे. हे बॉक्सिंगपटू कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरसह एकाच केंद्रात होते. ''डॉ. अमोल पाटील हे पटियाला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स संस्थेच्या मुख्य कॅम्पसनंतर केंद्रात होते. प्रोटोकॉलनुसार, मुख्य कॅम्पसमध्ये येण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती आणि ते पॉझिटिव्ह आढळले'', असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सांगितले आहे.
पाटील यांना शासकीय कोविड केंद्रात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची उद्या तपासणी केली जाईल. त्यांच्याबरोबर केंद्रात राहणाऱ्यांना एक आठवडा दूर राहावे लागेल. बॉक्सिंगपटूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही, मंगळवारी त्यांची पुन्हा चाचणी होईल.
एका सूत्राने सांगितले, डॉ. पाटील यांना कोणतीही लक्षणे नाहीत, सौम्य लक्षणेही आढळली नाहीत आणि ते लवकरच बरे होतील. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेपासून ते भारतीय संघाबरोबर आहेत. बॉक्सिंगपटू ऑगस्टमध्ये सराव सुरू करणार होते. हे सराव सत्र प्राधिकरणाच्या देखरेखीखाली असणार होते. मात्र, दिल्ली हायकोर्टाने बंदी घातलेल्या 59 राष्ट्रीय महासंघांपैकी बॉक्सिंग फेडरेशन ही एक संस्था होती. भारताच्या नऊ बॉक्सिंगपटूंनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.