मुंबई- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे आज (दि. २५ मे) मोहालीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ८ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बलबीर सिंग यांना श्रद्धांजली वाहली आहे. ते त्याच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'पद्मश्री बलबीर सिंग हे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी अनेकदा अभिमानाने आणि धैर्याने आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होते. त्यासोबत त्यांनी एक मार्गदर्शक म्हणूनही विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्तीईश्वर देवो.'