मुंबई- कोरोनामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेकांना परदेशात अडकून रहावे लागले आहे. भारताच्या विश्वचषक विजेत्या हॉकी संघातील माजी खेळाडू अशोक दिवाण हे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून भारतात परतण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याकडे केली आहे.
अशोक दिवाण हे भारताने १९७५ मध्ये जिंकलेल्या विश्वचषक हॉकी संघातील माजी खेळाडू आहेत. तसेच त्यांनी १९७६ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवाण यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ते लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकले आहेत. त्यात त्यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांनी आयओए अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्याशी संपर्क साधला आणि भारतात परण्यासाठी मदत मागितली.
दिवाण यांनी बात्रा यांना एक पत्र लिहले आहे, त्यात ते म्हणाले, ‘मी अमेरिकेत अडकलो असून त्यात माझी तब्येत बिघडली आहे. गेल्या आठवडय़ात मला कॅलिफोर्निया येथे तातडीने उपचार घ्यावे लागले. माझ्याकडे येथील वैद्यकीय विमा नाही. या स्थितीत मला अमेरिकेत उपचार घेणे परवडणारे नाही. मी नियोजित कार्यक्रमानुसार २० एप्रिलला एअर इंडियाच्या विमानाने भारतात परतणार होतो. मात्र लॉकडाऊनमुळे मी परतू शकलो नाही. मला अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत करावी किंवा सॅन फ्रान्सिस्कोहून भारतात परतण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा.'