मॉस्को- स्पॅनिश नॅशनल उच्च न्यायालयाने बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी विरोधातील आर्थिक फसवणुकीसंदर्भातील तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेस्सीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मेस्सीने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित 'बलॉन डी ओर' पुरस्कार पटकवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.
नेमकं काय आहे प्रकरण -
स्थानिक धर्मादायी संस्थेचे माजी कर्मचारी फेडरिको रेट्टोरी यांनी मेस्सीसह त्याचे वडील, भाऊ आणि इतर सदस्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली आहे. धर्मादायी संस्थेला मिळालेली देणगी मेस्सीच्या कुटुंबीयाने वापरली आहे, असा आरोप रेट्टोरी यांनी मेस्सीच्या कुटुंबावर केला आहे.
या प्रकरणात फेडरिको रेट्टोरी यांनी जूनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, या प्रकरणात पुरावे मिळाले नाहीत. तेव्हा न्यायालयाने सप्टेंबरमध्ये पुराव्याच्या अभावी तपास बंद करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा रेट्टोरी यांनी पुन्हा याचिका दाखल करत तपास सुरू करावा, अशी मागणी केली.