वॅलाडॉलिड -स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ब्राझीलचे दिग्गज माजी फुटबॉलपटू पेले यांचा सर्वाधिक गोलचा (क्लबकडून खेळतानाचा) विक्रम मोडित काढला. वॅलाडॉलिड संघाविरुद्ध गोल करत बार्सिलोनाच्या मेस्सीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बार्सिलोनासाठी ६४४ गोल नोंदवत एखाद्या क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा -बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!
पेले आणि क्लब सांतोस -
बार्सिलोनासाठी १७ हंगामात ७४९ सामने खेळताना मेस्सीने ही विक्रमी कामगिरी नोंदवली. पेले यांनी क्लब सांतोसकडून खेळताना ६४३ गोल केले होते. १९७४मध्ये पेले यांनी सांतोससाठी शेवटचा सामना खेळला होता. "जेव्हा मी फुटबॉल खेळू लागलो होतो, तेव्हा मी कधीही रेकॉर्ड मोडायचा विचार केला नव्हता. माझे संघ सहकारी, माझे कुटुंब, माझे मित्र आणि प्रत्येकजणांचे मी आभार मानू इच्छितो ज्यांनी मला वर्षानुवर्षे मदत केली'', असे मेस्सीने या कामगिरीनंतर इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.
ला-लीगामधील सामन्यात बार्सिलोनाने वॅलाडॉलिडला ३-० अशी मात दिली. मेस्सीने संघासाठी तिसरा गोल केला. या स्पर्धेच्या गुणतालिकेत बार्सिलोनाला पाचवे स्थान मिळाले आहे. येत्या २९ डिसेंबरला बार्सिलोना ईबरविरुद्ध सामना खेळेल.
मेस्सीला खुणावतोय पेलेंचा अजून एक विक्रम -
या विक्रमानंतर मेस्सीला पेलेंचा अजून एक विक्रम खुणावतो आहे. पेले यांनी राष्ट्रीय संघ ब्राझीलसाठी ७७ गोल केले आहेत. तर, मेस्सीने अर्जेंटिनासाठी ७१ गोल केले आहेत. येत्या काळात मेस्सीला हा विक्रमही मोडण्याची संधी आहे.