नवी दिल्ली - भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल ४३ वर्षांनी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत. एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. फेब्रुवारीत ही शिफारस करण्यात आली होती.
एएफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला एक पत्र पाठवले आहे. यात एएफसी महासचिव दाटो विडसर जॉन म्हणाले, '२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉलचे यजमानपद भारताला सोपविले आहे.'
भारताला आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान दिल्याबद्दल, आशियाई फुटबॉल परिसंघाचे, एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आभार मानले. तसेच त्यांनी, ही स्पर्धा महत्त्वाकांक्षी महिला फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारी ठरेल. भारतात महिला फुटबॉलमध्ये सामाजिक क्रांती आणणारी ही स्पर्धा असेल, असे म्हटलं आहे.