लंडन : गेल्या कित्येक वर्षांपासून इंग्लंड हे फुटबॉलच्या मोठ्या स्पर्धांमध्ये केवळ पात्रता फेऱ्यांमध्येच राहत होतं. मात्र, काल डेन्मार्कला उपांत्य फेरीमध्ये हरवत ५५ वर्षांमध्ये पहिल्यांदा इंग्लंडने फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.
लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये बुधवारी रात्री डेन्मार्क आणि इंग्लंडदरम्यान युरो कपचा दुसरा सेमीफायनल सामना पार पडला. या सामन्यात डेन्मार्कला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ ने हरवत इंग्लंडने फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. विशेष म्हणजे १९९२ला युरो कप जिंकलेल्या डेन्मार्कला यावेळी केवळ उपांत्य फेरीपर्यंतच जाता आलं.
डेन्मार्कसाठी सुरुवातीपासूनच हा सामना खराब राहिला. पहिली २० मिनिटं इंग्लंड पूर्णपणे आक्रमक खेळी करत होतं. मात्र, ३०व्या मिनिटाला मिळालेल्या एका फ्री-किकचा फायदा डेन्मार्कला झाला. या संधीचं सोनं करत मायकेल डॅम्सगार्डने गोल करत आपल्या संघाला एक गोल मिळवून दिला. पहिल्या हाफमध्ये स्कोरबोर्ड असाच राहील असं वाटत असतानाच, मध्यांतराच्या काही वेळापूर्वीच डेन्मार्कच्या सिमोन क्येरने आपल्याच गोलपोस्टमध्ये बॉल पाठवत आत्मघातकी गोल केला. यामुळे मग स्कोअरबोर्ड १-१ असा झाला.