बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर) : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीदरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. 10 फेब्रुवारीपासून गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ सुरू होत आहेत. यामध्ये देशभरातील हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. खेलो इंडिया हिवाळी खेळांबाबत खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गुलमर्गला पोहोचलेले क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर अतिशय उत्साही दिसत होते. बर्फवृष्टीचा आनंद लुटताना ते तिथे उपस्थित काही तरुणांसोबत क्रिकेट खेळले. या दरम्यान त्यांनी चौकार आणि षटकारही मारले. त्यांच्यासोबत बारामुल्ला जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही होते. अनुराग ठाकूरने यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
खेलो इंडिया हिवाळी खेळांचे उद्घाटन : शुक्रवारपासून गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ होणार आहेत. यासाठी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर गुलमर्गमध्ये उपस्थित असून शुक्रवारी ते खेळाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, संपूर्ण भारत खेलो इंडियाची वाट पाहत आहे. यामध्ये युवा, विद्यापीठ आणि हिवाळी खेळ आयोजित केले जातात. सध्या मध्य प्रदेशातील 9 शहरांमध्ये युवा खेळ सुरू आहेत. तर काश्मीरमध्ये हिवाळी खेळांचे आयोजन केले जात आहे. हिवाळी खेळांमध्ये देशभरातील 1500 हून अधिक खेळाडू 11 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.