कोलंबो Rohit Sharma Record :टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं सोमवारी (११ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करत आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३,००० धावांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. त्याच्यापाठोपाठ आता कर्णधार रोहित शर्मानही एक विक्रम केला.
रोहितनं वनडेमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठला : रोहितनं मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक सुपर फोर सामन्यात ४८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान २२ वी धाव पूर्ण करताच त्यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठला. असं करणारा तो भारताचा सहावा आणि जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाज कसून राजिताच्या डोक्यावर षटकार मारत त्यानं हा टप्पा गाठला.
भारताच्या या फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे : रोहितच्या आधी भारताकडून सचिन तेंडुलकर (१८,६२६ धावा), विराट कोहली (१३,०२४ धावा), सौरव गांगुली (११,३६३ धावा), राहुल द्रविड (१०,८८९ धावा) आणि महेंद्रसिंग धोनी (१०,७३३ धावा) यांनी वनडेमध्ये दहा हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितचा हा २४८ वा एकदिवसीय सामना असून त्यानं २४१ व्या डावात १०,००० धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीनं (२०५ डाव) त्याच्यापेक्षा कमी डावात ही कामगिरी केली आहे. तर सचिननं २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.