नवी दिल्ली :टीमचा गोलंदाज पियुष चावलाने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 स्पर्धेत पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या आयपीएलच्या 16व्या सामन्यात त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. मुंबईच्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पियुषने आक्रमक गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्ली संघाचे फलंदाज त्याच्यासमोर गारद झाले. 11 एप्रिल रोजी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पियुषने दिल्ली फ्रँचायझीविरुद्ध 4 षटके टाकली. 22 धावा खर्च करत त्याने दिल्लीच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकल्यानंतर संघाच्या ओनर नीता अंबानी यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
चावलाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर : आयपीएलच्या या मोसमातील संघाच्या पहिल्या विजयाबद्दल मुंबई फ्रँचायझीच्या ओनर नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. याचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. यासोबतच नीता अंबानी पियुष चावलाला ड्रेसिंग रूम प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करताना दिसत आहेत. त्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मासह संघातील सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवून पीयूष चावलाचा जयजयकार केला.