पुणे:मंगळवारी (10 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 57 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स संघातील हा दुसरा सामना आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स संघाने जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना लखनौ संघ जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अकरा सामने खेळले आहेत. त्यापैकी आठ सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ 16 गुणांसह आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघ ( Gujarat Titans Team ) देखील तितक्याच सामन्यात तेवढेच विजय आणि पराभव स्विकारुन गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कारण गुजरात संघाचे नेट रनरेट लखनौ संघापेक्षा कमी आहे.
हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) नेतृत्वाखालील गुजरातला गेल्या आठवड्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे लखनौने त्यांचे शेवटचे चार सामने जिंकले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 75 धावांनी मिळवलेल्या विजयाचा समावेश आहे, ज्यामुळे लखनौचा संघ मनोबल वाढवत मैदानात उतरेल. केएल राहुलने ( Captain KL Rahul ) आतापर्यंत लखनौच्या नेतृत्वाची जबाबदारी चोख निभावली आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यांत 451 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. लखनौचा संघ फलंदाजीत त्याच्यावर खूप अवलंबून आहे. पण अलीकडील सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी अधिक जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे राहुलचा भार कमी झाला आहे.