नवी दिल्ली -भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळली जाणारी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे. आत्तापर्यंत ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. उभय संघातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. या कसोटीसाठी चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
गाबाच्या खेळपट्टी ही ऑस्ट्रेलियासाठी वरदान आहे. तर, भारतासाठी ही खेळपट्टी भयानक स्वप्नाप्रमाणे आहे. टीम इंडियाने ब्रिस्बेनच्या मैदानावर एकूण सहा कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना पाच पराभव स्वीकारावे लागले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
२००३मध्ये या मैदानावर भारताने कसोटी सामना खेळला होता. ही कसोटी बरोबरीत राहिली होती. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीने १४४ धावा ठोकल्या होत्या. तर पहिल्या डावात झहीर खानने पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला होता.
ब्रिस्बेन (गाबा) मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी :
- पहिली कसोटी (१९४७) : भारताचा एक डाव आणि २२६ धावांनी पराभव.
- दुसरी कसोटी (१९६८) : भारताचा ३९ धावांनी पराभव.
- तिसरी कसोटी (१९७७) : भारताचा १६ धावांनी पराभव.
- चौथी कसोटी (१९९१) : भारताचा १० गड्यांनी पराभव.
- पाचवी कसोटी (२००३) : अनिर्णित.
- सहावी कसोटी (२०१४) : भारताचा ४ गड्यांनी पराभव.
हेही वाचा - पांड्या-हुड्डाच्या भांडणात इरफान पठाणची उडी, म्हणाला...