ब्रिस्बेन -आजचा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत बॉर्डर-गावसकर मालिका आपल्या नावावर केली. भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने अभेद्य ८९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असल्याची भावना रिषभने व्यक्त केली. सामन्यानंतर रिषभने आपली प्रतिक्रिया दिली.
पंतला सर्वोत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसऱ्या डावात त्याने १३८ चेंडूंचा सामना करत नाबाद ८९ धावा फटकावल्या. या खेळीत पंतने ९ चौकार आणि एक षटकारही लगावला. पंत म्हणाला, "हा आतापर्यंतचा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. संघात नसताना मला सहाय्यक कर्मचारी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी साथ दिली याचा मला आनंद आहे. ही एक स्वप्नासारखी मालिका आहे. टीम मॅनेजमेंटने नेहमीच मला पाठिंबा दर्शविला. मी एक सामना जिंकवणारा खेळाडू असल्याचे ने नेहमी सांगायचे. मलाही भारताला सामना जिंकवून द्यायचा होता आणि आज मी ते केले.''