रायपूर Ind Vs Aus :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी २० सामन्यांच्या मालिकेतील ४ था टी २० सामना शुक्रवारी (१ डिसेंबर) झाला. रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अजेय बढत घेतली.
भारताची प्रथम फलंदाजी : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी ५० धावांची सलामी दिली. जयस्वाल २८ चेंडूक ३७ धावा करून बाद झाला. तर ऋतुराजनं २८ चेंडूत ३२ धावांचं योगदान दिलं. अय्यर आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात काही मोठी खेळी करू शकले नाही. ते अनुक्रमे ८ आणि १ धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंहनं २९ चेंडूत धुवांधार ४६ धावा केल्या. तर युवा जितेश शर्मानं फक्त १९ चेंडूत ३५ धावा ठोकल्या. अशाप्रकारे भारतानं निर्धारित २० षटकांत १७४-९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुईसनं ४० धावा देऊन ३ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली :धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. जोश फिलिप ८ धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेडनं १६ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तर बेन मॅकडरमॉटनं २२ चेंडूत १९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मोठी खेळू करू शकला नाही. कर्णधार मॅथ्यू वेड २३ चेंडूत सर्वाधिक ३६ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून अक्षर पटेलनं घातक गोलंदाजी केली. त्यानं १६ धावा देऊन ३ बळी घेतले.