दुबई - आयपीएल 2021 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. उभय संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दिल्लीला आजच्या सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफची दावेदारी भक्कम करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या हंगामाची सुरूवात चांगली करण्याच्या उद्देशान मैदानात उतरेल.
कोरोनामुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आल्यापूर्वी दिल्ली संघाने 8 सामन्यात 6 विजयासह 12 गुण मिळवले आहेत. तर हैदराबादचा संघाला 7 पैकी एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
श्रेयस अय्यर संघात परतल्याने दिल्लीची फलंदाजी आणखी बळकट झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. टी-20 नटराजन याने आयपीएल मध्ये 16 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. त्याने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात 7 पैकी फक्त 2 सामने खेळली आहेत. नटराजनच्या गुडघ्यावर सर्जरी करण्यात आली होती. यामुळे तो इंग्लंड दौऱ्याला देखील मुकला होता. त्याच्या जागेवर सौराष्ट्रचा गोलंदाज अरजान नागवसवाला यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.
टी. नटराजन याच्या संघात वापसी झाल्याने, हैदराबादचा गोलंदाजी विभाग भक्कम झाला आहे. त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार, खलील अहमद तसेच राशिद खान अशा चांगल्या गोलंदाजांचा ताफा आहे. दुसरीकडे दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यासारख्या स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे.