नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात काही असे रेकॉर्ड आहेत जे मोडणं कोणालाही जवळपास अशक्यच. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं तब्बल ६ वर्ल्डकप खेळले आहेत. या दरम्यान त्यानं असे अनेक रेकॉर्ड बनवले आणि मोडले देखील. विश्वचषकात सर्वाधिक धावा हा त्यापैकीच एक विक्रम. हा विक्रम नजिकच्या काळात तरी कोणता खेळाडू मोडू शकेल याची शक्यता नाही. मात्र काही असे फलंदाज आहेत जे सचिनच्या या रेकॉर्डच्या जवळपास पोहचले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ५ अव्वल खेळाडू.
- सचिन तेंडुलकर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १९९२ पासून २०११ पर्यंत ६ वर्ल्डकपमध्ये भाग घेतला. या काळात त्यानं ४५ सामने खेळले, ज्यापैकी त्याला ४४ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. सचिन तेंडुलकरनं या ४४ डावात ५६.९५ च्या शानदार सरासरीनं २२७८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं ८८ च्या स्ट्राइक रेटनं ६ शतकं आणि १५ अर्धशतकं झळकावली. तसेच तो दोनदा शून्यावर बाद झाला आहे. विश्वचषकात १५४ ही सचिनची सर्वोच्च धावसंख्या आहे.
- रिकी पाँटिंग :विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप ५ फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टरनंतर नाव येतं ते रिकी पाँटिंगचं. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजानं १९९६ ते २०११ या कालावधीत ५ विश्वचषक खेळले. या दरम्यान त्याला ४६ सामन्यांच्या ४२ डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. ४२ डावांमध्ये त्यानं ४५.८६ च्या सरासरीनं १७४३ धावा केल्या आहेत. या कालावधीत रिकी पाँटिंगनं ५ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली. रिकी पाँटिंग विश्वचषकात फक्त एकदा शून्यावर बाद झाला आहे. १४० ही त्याची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
- कुमार संगकारा : श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो २००३ ते २०१५ पर्यंत ४ विश्वचषक खेळला. या दरम्यान त्यानं ३७ सामने खेळले असून त्यात त्याला ३५ डावात फलंदाजीची संधी मिळाली. विश्वचषकात कुमार संगकारानं ५६.७४ च्या सरासरीनं १५३२ धावा केल्या आहेत. संगकारानं वर्ल्ड कपमध्ये पाच शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावली आहेत. विश्वचषकात तो एकदा शून्यावर बाद झाला होता. संगकाराची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या १२४ आहे.
- ब्रायन लारा :विश्वचषकातील टॉप ५ फलंदाजांच्या यादीत चौथं नाव वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचं आहे. १९९२ ते २००७ या कालावधीत त्यानं ५ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. या दरम्यान त्यानं ३४ सामने खेळले असून त्यात त्यानं ३३ डावात फलंदाजी केली. विश्वचषकात लारानं ४२.३४ च्या सरासरीनं १२२५ धावा केल्या आहेत. यात त्यानं दोन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली. तसेच तो केवळ एकदा शून्यावर बाद झाला आहे. ११६ ही ब्रायन लाराची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
- एबी डिव्हिलियर्स : विश्वचषकातील टॉप ५ फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्सचं नाव पाचवं आहे. ३६० डिग्री प्लेअर म्हणून ओळख असलेल्य डिव्हिलियर्सनं २००७ ते २०१५ या कालावधीत ३ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. या दरम्यान त्यानं २३ सामन्यांच्या २२ डावांमध्ये तब्बल ६३.५२ च्या सरासरीनं १२०७ धावा केल्या आहेत. यासोबतच एबी डिव्हिलियर्सनं विश्वचषकात चार शतकं आणि पाच अर्धशतकही झळकावली. विशेष म्हणजे तो ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. डिव्हिलियर्सची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या १६२ आहे.