चेन्नई Cricket World Cup 2023 :क्रिकेट विश्वचषक 2023 चा थरार सध्या जगभरात सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघात झालेल्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली आहे. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या सामन्यात आपल्या गोंधळासाठी कुप्रसिद्ध असलेल्या डॅनियल जार्विस उर्फ जार्वोनं एन्ट्री केली होती. यावेळी तो के एल राहुलला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यामुळं के एल राहुल त्याला मैदानाबाहरे जाण्याचा इशारा करताना दिसला. मात्र विराट कोहलीनं यामध्ये हस्तक्षेप केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसंच विराट कोहलीनं माझ्या कामाचं कौतुक केल्याचा दावा जार्वोनं केला आहे.
जार्वो 69 ची चेपॉकवर एन्ट्री :भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाच्या विश्वचषकातील सामन्यावर जगभरातील क्रीडा रसिकांचं लक्ष लागून होतं. मात्र या संघाच्या सामन्यादरम्यान कुप्रसिद्ध जार्वो 69 यानं सुरक्षा तोडून मैदानात एन्ट्री केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. जार्वोनं आपल्या मैदानात आक्रमण केल्यानंतरचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यात त्यानं भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आपल्याला मदत केल्याचा दावा केला आहे. विराट कोहलीनं आपल्या कामाचं कौतुक केल्याचंही जार्वोनं म्हटलं आहे.
सुरक्षा भेदल्यानं मैदानात गोंधळ : जार्वो 69 नं सुरक्षा व्यवस्था भेदून चेपॉक मैदानात एन्ट्री केल्यानं सुरक्षा रक्षकांचा चांगालाच गोंधळ उडाला. यावेळी विराट कोहलीनंही जार्वो 69 कडं धाव घेत त्याला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. मात्र विराट कोहलीनं आपल्याला मदत केल्याचा दावा जार्वो 69 नं केला आहे.