नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत महत्त्वाचा खुलासा केला आहे. 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता. मात्र, त्यानंतर परिस्थिती बदलली, असे युवराज म्हणाला.
युवराजने 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळला. त्यावर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 372 धावा केल्या. यात त्याची इंग्लंडविरुद्ध कटकमध्ये खेळलेली 150 धावांची खेळीही समाविष्ट आहे.
युवराज म्हणाला, "मी परतलो तेव्हा विराट कोहलीने मला पाठिंबा दर्शवला. जर त्याने मला साथ दिली नसती तर, मी परत येऊ शकलो नसतो. पण, धोनीने मला 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेविषयी सत्य सांगितले. निवडकर्ते तुझा विचार करत नाही असे मला त्याने सांगितले."
युवराज म्हणाला, "2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि तो मला सांगायचा की तू माझा मुख्य खेळाडू आहेस. पण दुखापतीतून परत आल्यानंतर गोष्टी बदलल्या आणि संघात बरेच बदल झाले. त्यानंतर मला समजले, की कर्णधार म्हणून आपण नेहमीच सर्व गोष्टी सिद्ध करु शकत नाही कारण शेवटी संघ कसा कामगिरी करतो हे आपल्याला पाहावे लागते."