मुंबई - भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज रसिख सलाम यांची गोलंदाजी पाहून फारच प्रभावित झाला आहे. १७ वर्षांचा हा खेळाडू भविष्यात स्टार गोलंदाज बनेल अशी भविष्यवाणी युवराज सिंगने केली आहे.
या वर्षी रसिख सलामने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यात त्याला विकेट मिळाले नसले तरी वेग आणि स्वींगने साऱ्यांची मने जिंकली. त्यात युवराजचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सने २०१९ च्या लिलावात त्याला २० लाख रुपयात विकत घेतले आहे.
युवराज म्हणाला, रसिखने चांगली स्विंग गोलंदाजी केली. त्याला शेवटी २ षटकार मारले तरी त्याने त्यापूर्वी चांगली गोलंदाजी केली होती. त्याचा हा पहिलाच सामना होता. येत्या २-३ वर्षात तो खास खेळाडू बनेल.
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीदेखील रसिख सलामची गोलंदाजी पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याच्यात शिकण्याची कला असल्याचे सांगितले.
सलामने पहिल्याच सामन्यात ४ षटकांत ४२ धावा दिल्या असल्या तरी त्याचे सर्वेत्र कौतुक होत आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या सर्व गोलंदाजीची धुलाई केली. हा सामना मुंबई इंडियन्सने ३७ धावांनी गमावला.