केपटाऊन -इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात अनोखा विक्रम रचला. या सामन्यात स्टोक्सने एका डावात पाच झेल घेतले. अशी कामगिरी करणारा स्टोक्स हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा -AUS VS NZ : लिओनचा जबराट 'पंच', न्यूझीलंड पराभवाच्या छायेत
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर स्टोक्सने एनरिक नॉर्ट्जेचा झेल घेत या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यातील पाचही झेल स्टोक्सने स्लिपमध्ये घेतले आहेत. विशेष म्हणजे, तब्बल १०१९ कसोटी सामन्यानंतर, इंग्लंडच्या खेळाडूने असा विक्रम रचला आहे. याआधी एका डावात इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूकडून चार झेल घेण्यात आले होते.
गेल्या वर्षी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर रंगलेल्या आयर्लंडविरुद्धच्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चार झेल घेतले होते. स्टोक्सने पाच झेलच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. स्टोक्सच्या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने २०१७-१८ मध्ये ही कामगिरी नोंदवली होती