इंदूर -भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-२० सामन्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिली धाव घेताच मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. विराट आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा -WWE मधील सामने फिक्स असतात!... 'द ग्रेट खली'ने केला गौप्यस्फोट
या सामन्यापूर्वी, २६३३ धावांसह विराट आणि भारताचा सलामीवीर रोहित शर्मा एकाच स्थानावर होते. मात्र, आता विराटने त्याला मागे टाकले आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मंगळवारी खेळलेल्या सामन्यात कोहलीने श्रीलंकाविरुद्ध १७ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी केली. शिवाय, खेळीच्या शेवटी 'नटराज शॉट'चा नजराणा पेश करत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला.
कोहलीने खेळलेल्या ७७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ७१ डावांमध्ये २४ अर्धशतकांसह २६६३ धावा केल्या आहेत. तर, त्याचबरोबर रोहित शर्माने १०४ सामन्यात ३२.१० च्या सरासरीने २६३३ धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल असून त्याने २४३६ धावा केल्या आहेत. त्यानंतर, शोएब मलिक आणि बॅन्डन मॅक्युलम २२६३ धावा आणि २१४० धावाांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. शिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान एक हजार धावांचा टप्पा गाठण्यातही कोहली पुढे आहे. त्याने ३० डावांत तर, आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसने ३१ डावांत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.