हॅमिल्टन- भारतीय संघाने आज सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आणि ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या विजयानंतर बोलताना, कर्णधार विराट कोहलीने, हा सामना आम्ही जिंकू असे वाटत नव्हते, असे सांगितले.
सामना संपल्यानंतर बोलताना विराटने सांगितले की, 'केन विल्यम्सन ९५ धावांवर खेळत होता. यामुळे आम्हाला हा सामना जिंकता येणार नाही, असे मला वाटले होते. पण, विल्यम्सन बाद झाला आणि न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागले. पराभव झाल्यानंतर विल्यम्सनबद्दल मला वाईट वाटले. कारण एवढी मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारल्यानंतर सामना गमवावा लागतो. तेव्हा काय वेदना होतात हे मला माहीत आहे.'
मोहम्मद शमीने २० व्या षटकात केन विल्यम्सनला माघारी धाडले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी न्यूझीलंडला केवळ एकच धाव हवी होती. पण शमीने टिच्चून गोलंदाजी करत रॉस टेलरला बाद केले.
शमीविषयी बोलताना विराटने सांगितले की, 'शमी शेवटचा चेंडू टाकणार होता. त्यावेळी आमची चर्चा झाली. यावेळी आम्ही स्टंम्प्सलाच टार्गेट करण्याचा निर्णय घेतला. कारण तसे केले नसते तर एक धाव सहज निघाली असती.'