नवी दिल्ली - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ३६९ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पदार्पणाच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन यांनी खास विक्रमाला गवसणी घातली.
हेही वाचा - इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या हॉटेलमध्ये कोरानाचा शिरकाव
१९४९ नंतर पहिल्यांदा भारताच्या दोन पदार्पणवीरांनी आपल्या पहिल्या डावातच प्रत्येकी तीन बळी घेतले आहेत. १९४९मध्ये मंटू बॅनर्जी (४/१२०) आणि गुलाम अहमद (४/९४) यांनी कोलकाता मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता. तर, आजच्या सामन्यात टी नटराजनने ७८ धावांत आणि सुंदरने ८९ धावांत प्रत्येकी तीन बळी घेतले आहेत.
नटराजन-सुंदरचे पदार्पण -
या कसोटी सामन्यात भारताकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. सिडनी कसोटीत दुखापत झालेले जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी या सामन्यात खेळत नसल्याने नटराजन आणि सुंदरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तर, ऑस्ट्रेलियाकडून विल पुकोव्स्की संघाबाहेर असून मार्कस हॅरिसला सामना खेळण्याची संधी मिळाली.