लखनऊ - १० जानेवारीपासून रंगणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश (यूपी) संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. अनुभवी फलंदाज सुरेश रैनासह वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात संधी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी शुक्रवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.
प्रियम गर्ग कर्णधार -
कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, सात खेळाडूंनादेखील राखीव ठेवण्यात आले असून दोन यष्टीरक्षकांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. यावेळी संघाची कमान प्रियम गर्गकडे आहेत. यूपीच्या संघात यावेळी अनेक बदल झाले आहेत. त्याअंतर्गत पुन्हा एकदा ज्ञानेंद्र पांडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आयपीएलबाहेर पडलेला भुवनेश्वर कुमार सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेतून मैदानात परतणार आहे. जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब, रेल्वे आणि त्रिपुरासह उत्तर प्रदेश संघ अ गटात आहे.