मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या, शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंह, शिखर धवन या खेळाडूंच्या पाठोपाठ सुरेश रैनाने खडसावले आहे. रैनाने, दुसऱ्याच्या मदतीवर जगणाऱ्या अपयशी देशासाठी काहीतरी करावे आणि काश्मीरचा मुद्दा सोडून द्यावा, असे सांगत आफ्रिदीला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
रैनाने ट्विट करून शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. रैना त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, 'इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, हे सांगता येत नाही. जो देश आधीच दुसऱ्यांनी दिलेल्या भिक्षेवर जगत आहे. त्या अपयशी देशासाठी तू काही तरी करावे. काश्मीरचा विचार करू नये. काश्मिरी असल्याचा मला गर्व आहे आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भागच राहील.'
दरम्यान, याआधी गौतम गंभीरने त्याच्या ट्विटमध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला आहे. गंभीरने आफ्रिदी, इम्रान खान, बाजवा यांचा उल्लेख 'जोकर' असा केला आहे. हे तिघे मोदी यांच्याबद्दल विष पसरवण्याचा काम करत आहेत. यातून ते पाकच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे ना? असेही त्याने म्हटले आहे. गंभीर शिवाय हरभजनने आफ्रिदीला 'मर्यादेत बोल,' असा सल्ला दिला आहे.