बंगळुरू - आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल खेळल्या गेलेला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सतत पडणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ५-५ षटकांचा करण्यात आला होता. मात्र बंगळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या ४१ धावा झाल्यानंतर परत पाऊस आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
श्रेयस गोपालची हॅटट्रीक
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५ षटकांमध्ये ७ विकेट गमावत ६२ धावा केल्या होत्या. यात विराट कोहलीने सर्वाधिक ७ चेंडूत २५ धावा केल्या. गोलंदाजीत राजस्थानच्या श्रेयस गोपालने शानदार कामगिरी आयपीएलमधील आपली पहिली हॅटट्रीक साजरी केली. श्रेयसने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या ३ चेंडूत कोहली, डिव्हिलियर्स आणि स्टॉइनिसला माघारी धाडत हॅटट्रीक साजरी केली. मात्र पावसामुळे गोपालची ही हॅटट्रीक पाण्यात गेली.
बंगळुरूने दिलेल्या ६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने ३.३ षटकांत ३ गडी गमावत ४१ धावा केल्या. मात्र यानंतर परत पाऊस आल्याने सामना रद्द करण्यात आला.