दुबई- आयसीसीने लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बंदीच्या कारवाईनंतर आयसीसीने शाकिब आणि दीपक अग्रवाल नावाच्या बुकी यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपशील जारी केला आहे. दरम्यान, या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या तपशीलाचा घटनाक्रम -
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या तपशीलात दीपक अग्रवालने शाकिबला २०१७ मध्ये संपर्क केला होता. २०१७ नंतर शाकिब सतत दीपकच्या संपर्कात होता. बांगलादेश प्रीमीयर लीग २०१७ च्या हंगामात शाकिब ढाका डायनामाइट्स संघाचा सदस्य होता. त्यावेळी देखील दीपक अग्रवालने शाकिबला संपर्क केला असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
दीपकने बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये सामन्यांपूर्वी संघाच्या रणणितीविषयीची गुप्त माहिती शाकिबला मागितली होती. मात्र, ही माहिती मी दिली नसल्याचे शाकिबने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दीपकने व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे शाकिबला भेटण्याची मागणीही केली होती.
जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेश श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघातील तिरंगी मालिकेदरम्यान, दीपकने व्हॉट्सअॅप मॅसेजवर शाकिब संपर्क केला होता. १९ जानेवारी २०१८ ला शाकिबला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. यावेळी दीपकने शाकिबला मेसेज करत अभिनंदन केले होते.