कराची- आम्ही (पाकिस्तान) भारताशी क्रिकेट खेळायला तयार आहोत. परंतु मोदी सरकार असल्याने प्रचंड नकारात्मकता त्यांच्याकडून येत आहे. त्यामुळे ते शक्य नाही, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
कोरोना लढ्यात मदनिधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्या मालिका खेळवण्याचा पर्याय पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होतो. यावर शाहिद आफ्रिदीनेही शोएबच्या समर्थनात कमेंट केली होती. पण शोएबच्या या पर्यायावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि मदन लाल यांनी टीका केली. कपिलने भारताला पैसासाठी मदतनिधी सामन्याची गरज नसल्याचे म्हटले तर मदन लाल यांनी हा निर्णय मोदी सरकार घेईल, असे सांगितले होते. आता भारत-पाक मालिकेवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आफ्रिदीने बोचरी टीका केली आहे.
आफ्रिदी म्हणाला, 'पाकिस्तानला भारताविरुद्ध क्रिकेट खेळायचे आहे, परंतु सध्या मोदी सरकारमध्ये प्रचंड नकारात्मकता आहे आणि त्यामुळे द्विदेशीय मालिका होणे अवघड आहे. पाकिस्तान मालिकेबाबत सकारात्मक दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत आहे. तशीच सकारात्मकता भारताकडूनही अपेक्षित आहे.'