बंगळुरु - भारताचा हिटमॅन रोहित शर्मासाठी बुधावारच्या दिवशी होणारा दुसरा टी-२० सामना खूप खास असणार आहे. रोहित शर्मा ३०० टी-२० सामने खेळणारा तिसरा भारतीय क्रिकेटर होणार आहे. या विक्रमासह तो एम.एस. धोनी आणि सुरेश रैना यांच्या क्लबमध्ये सहभागी होईल.
रोहितने भारतीय संघाकडून ९४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहे. याचसोबत त्याने मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स या संघाचे प्रतिनिधीत्व केला आहे. बुधवारच्या सामन्यात रोहित खेळला तर त्याच्या नावावर हा नवा विक्रम होऊ शकतो. पण त्याच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त केली जात आहे.
त्याचसोबत रोहितला सर्वाधिक षटकार खेचण्यात मार्टिन गुप्टिल (१०३) आणि ख्रिस गेल(१०३) यांचे विक्रम मोडण्यासाठी २ षटकारांची गरज आहे. असे केल्यास तो टी-२० क्रिकेट मधला नवा सिक्सर किंग ठरेल.
पहिल्या सामन्यात रोहित अवघ्या ५ धावा काढून स्कूप शॉट खेळून स्वस्तात बाद झाला. पण दुसऱ्या सामन्यात त्याच्या चाहत्यांना रोहितच्या बॅटमधून धमाकेदार खेळीची अपेक्षा आहे. जागतिक क्रिकेटमध्ये १४ क्रिकेटर असे आहेत जे ३०० किंवा त्यापेक्षा जास्त टी-२० सामने खेळले आहेत. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ४५१ सामन्यासह या यादीत पहिल्या स्थानी आहे.