राजकोट - रणजी करंडकाचा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात रंगला आहे. या सामन्यात बंगालने चौथ्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात ६ बाद ३५४ धावा केल्या आहेत. अनुस्तूप मजूमदार ५८ तर अर्नब नंदी २८ धावांवर नाबाद आहेत. अद्याप बंगाल ७१ धावांची पिछाडीवर आहे.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४२५ धावा केल्या. तेव्हा बंगालने तिसऱ्या दिवसअखेर ६५ षटकात ३ बाद १३४ धावा केल्या होत्या. आज १३४ धावांवरुन पुढे खेळताना बंगालने ६ बाद ३५४ धावा केल्या.
तिसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या सुदीप चॅटर्जी आणि वृद्धीमान साहाने अर्धशतक पूर्ण केलं. सुदीप आणि साहा या जोडीने उपहारापर्यंत चिवट खेळी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी १०१ धावांची भागिदारी केली. सुदीप ८१ धावांवर धर्मेंद्रसिंह जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर साहाला प्रेरक मांकडने माघारी धाडलं. साहाने ६४ धावांची खेळी केली. साहा पाठोपाठ शाहबाज अहमदही (१६) बाद झाला.
तेव्हा अनुस्तूप मजूमदार आणि अर्नब नंदी या जोडीने नाबाद ९१ धावांची भागिदारी केली. यादरम्यान, मजूमदारने अर्धशतक पूर्ण केलं. मजूमदार ५८ तर नंदी २८ धावांवर नाबाद आहेत. चौथ्या दिवशी धर्मेंद्रसिंह जडेजा, प्रेरक मांकड आणि चेतन सकारिया यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.