गुवाहाटी - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे खेळपट्टी ओलसर झाल्याने, रद्द करण्यात आला. पण गुवाहाटीच्या स्टेडियमची खेळपट्टी पावसामुळे ओली झाली नाही, तर खेळपट्टीवर झाकण्यात आलेल्या कव्हरला भोकं पडली होती. त्यातून पाणी आतमध्ये शिरले आणि खेळपट्टी ओलसर झाली असल्याचे समोर आले आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. तेव्हा मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर कव्हरचे आच्छादन अंथरले. या कव्हरला भोकं पडलेली होती. या भोकांमधून पावसाचे पाणी आतमध्ये गेले आणि खेळपट्टी ओलसर झाली.
समालोचक आकाश चोप्राने एका क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितले की, 'ही क्षुल्लक चूक आहे. खेळपट्टी झाकण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी जी कव्हर घातली होती, त्यात काही ठिकाणी भोकं पडली होती. ज्यामधून काही प्रमाणात पाणी खेळपट्टीवर गेलं. हा निष्काळजीपणा आहे, आंतरराष्ट्रीय सामन्यात तुम्ही अशा चुका करुच शकत नाही.'