चेन्नई - इंग्लंडने भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात विजयासाठी ४२० धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने ही कसोटी २२७ धावांनी जिंकली. दरम्यान, इंग्लंडच्या या विजयात जेम्स अँडरसन आणि जॅक लीच या जोडीने भेदक गोलंदाजी केली. अँडरसनने तर एका षटकात दोन बळी घेत मास्टरस्ट्रोक मारला.
जॅक लीचने चेतेश्वर पुजाराला बेन स्टोक्सकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ३८ वर्षीय अँडरसनने धारदार षटक फेकले. त्याने आपल्या दुसऱ्या स्पेलच्या पहिल्याच षटकात चार चेंडूत भारतीय संघाला दोन धक्के दिले, त्यानंतर पुढील षटकात त्याने ऋषभ पंतला बाद केले.
जेम्स अँडरसनने एका षटकात शुबमन गिलला सुरेख चेंडूवर त्रिफळाचीत केले. यानंतर त्याने त्याच षटकात उपकर्णधार अजिंक्य रहाणेला देखील त्रिफळाचीत झाला. गिलप्रमाणेच इनस्विंग चेंडू न खेळता आल्याने अजिंक्यला शून्यावर माघारी परतावे लागले. महत्वाचे म्हणजे, अँडरसनने हे षटक निर्धाव फेकले. त्यानंतर त्याने त्याच्या पुढील षटकात स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. अँडरसनने दुसऱ्या स्पेलमध्ये ५ षटके फेकली आणि त्यापैकी ३ निर्धाव षटके होती. यात त्याने ६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.