नवी दिल्ली -आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा घोट्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक संजय भारद्वाज यांनी ही माहिती दिली. विदर्भविरुद्ध सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात इशांतला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.
हेही वाचा -अवघ्या ४१ धावांत भारताने उडवला प्रतिस्पर्धी संघाचा खुर्दा!
'या दुखापतीतून सावरण्यासाठी इशांतला सहा आठवड्यांकरिता पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनसीएमध्ये गेल्यानंतर, पुढील परिस्थिती काय असेल हे नंतर कळेल', असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. सोमवारीच इशांतचे एमआरआय स्कॅन झाले होते आणि मंगळवारी अहवालात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले आहे.
न्यूझीलंडमध्ये भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेची पहिली कसोटी २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान खेळवला जाईल.