अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, १५ ऑगस्टला अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनी पुन्हा मैदानात पाहायला मिळेल. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ विजयी सुरूवात करण्यासाठी उत्सुक आहे.
उभय संघातील आकडेवारी पहिल्यास मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईवर वरचढ ठरलेला आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत २८ सामने झाले आहे. यात चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने चेन्नईला १७ वेळा पराभूत केले आहे. तर चेन्नईने ११ विजय मिळविले आहेत. असे असले तरी, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने सलामीचा सामना अद्याप जिंकलेला नाही.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटानी सुरू होईल. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे.