मुंबई - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्द टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठीची आज भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी टी-२० मालिकेतील मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होणारा पहिला सामना होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. हा सामना ६ डिसेंबरला होणार आहे. या तारखेला बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर आता अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात ६ डिसेंबरला 'महापरिनिर्वाण दिवस' असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.
या कारणाने मुंबई पोलिसांनी भारत-विडींज सामन्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी आम्हाला या विषयाची कल्पना दिली आहे. पण, आम्ही पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहोत. या भेटीनंतर सामना होईल की नाही, हे स्पष्ट होईल.'