चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जात असून आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ७४ षटकात ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. भारतीय संघावर फॉलोऑनचे सावट आहे.
तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ८ विकेट ५५५ वरून खेळायला सुरूवात केली. तेव्हा त्यांचा पहिला डाव ५७८ धावात आटोपला. यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाला सुरूवात झाली. तेव्हा भारतीय संघाची आघाडीची फळी कोळमडली.
इंग्लंडच्या विशाल ५७८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. जोफ्रा ऑर्चरने रोहित शर्माला बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. रोहितने ६ धावा केल्या. यानंतर ऑर्चरनेच शुबमन गिलला वैयक्तिक २९ धावांवर बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले.
कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा ही जोडी भारतीय संघाचा डाव सावरणार असे वाटत असताना, कर्णधार कोहली बाद झाला. त्याला डॉम बेस याने ओली पोप करवी झेलबाद केले. विराटने ११ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील अवघ्या १ धाव काढून बाद झाला. डॉम बेसच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने रहाणेचा अप्रतिम झेल टिपला. भारताची आघाडीची फळी शंभरीच्या आत परतली. तेव्हा अनुभवी पुजाराने ऋषभ पंतसोबत पाचव्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. पंतने आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश करत ४० चेंडूत अर्धशतक झळकावले.
पुजारा वैयक्तिक ७३ धावांवर बाद झाला. त्याला डोम बेसने रोरी बर्न्सकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर ऋषभ पंत नर्वस नाईटीचा शिकार बनला. पंत डोम बेसच्या गोलंदाजीवर ९१ धावांवर बाद झाला. यानंतर वॉशिग्टन सुंदर आणि अश्विन या जोडीने टीम इंडियाचे अधिक नुकसान होऊ दिले नाही. भारताने तिसऱ्या दिवसाअखेर ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून डोम बेसने ४ तर जोफ्रा आर्चरने २ गडी टिपले. भारतीय संघ ३२१ धावांनी पिछाडीवर आहे.