मुंबई- आशिया इलेव्हन आणि विश्व इलेव्हन यांच्यातील लढत अहमदाबाद येथे तयार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार होती. पण, या सामन्याच्या यजमानपदावरून भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने माघार घेतली आहे. दरम्यान, हा सामना मार्चमध्ये होणार होता. पण, स्टेडियमचे काम मार्चपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याने, बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या निर्णयामुळे हा सामना बांगलादेशच्या शेर-ए-बांगला मिरपूर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मार्च महिन्यात दोन टी-२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आशिया इलेव्हन आणि विश्व इलेव्हन संघात हे सामने होणार असून या सामन्याला आयसीसीने अधिकृत दर्जा द्यावा, अशी विनंती 'बीसीबी'ने केली आहे. दोनही सामने सुरूवातीला बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार होते. काही दिवसांनी, यातील एक सामन्याचे यजमानपद बीसीसीआय भूषवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
उभय संघातील सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथे उभारले जात असलेल्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियममध्ये करणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. दरम्यान, बीसीसीआयने आता मार्चपर्यंत सरदार पटेल स्टेडियमचे काम पूर्ण होणार नसल्याने, सामन्याच्या यजमानपदावरुन माघार घेतली आहे.